आस मनाची

*आस माझ्या मनाची* 

राजमान्य राजेश्री विठोबा व रुक्मिणी देवी, 
देवा माझ्या अशा संबोधनाने तुझ्या काळजात एक हलकीशी कळ उमटली ना, की आपली लेक आपल्याला माऊली व रुक्मिणी देवीस माता न म्हणता असं परक्यासारखं काय संबोधते. पण तुला तर सर्वच माहित आहे ना, का आलाय माझ्या बोलण्यात असा तुटकपणा. अरे आमच्या सर्वांची माऊली ना तू, मग का असा कमरेवर हात ठेवून वीटेवर उभा आहेस! आज तर काय तुझा दिवस, मग काय खूपच आनंदी आहेस ना तू !
 *" अगं अगं नाही ग, तुम्ही कोणीच भक्त जर येणार नसाल तर आषाढी एकादशीचा आनंद कसा असेल ग माझ्या रायाला."* 
वा माते , शोभतेस ग खरी बायको 
स्वतः रुसून दूर जाशील पण आम्ही काही माऊलीला बोलल तर नवऱ्याची बाजू तू   लढवशील. माते तू तर आमच्या सारखीच मग तुला आमचं दुःख कळत नाही का?
आता यंदाचं दुसरे वर्ष ना माऊली......
सर्व शुकशुकाट आहे. 
वारक-याना काही नको रे फक्त तुझ्या दर्शनाची आस आहे. अरे आपल्या बालकाचे लाड तू नाही तर कोण पुरवणार! मी  माझ्यासाठी नाही म्हणत रे, आम्ही काय  शाळांना सुट्ट्या, नोकरीत मिळणाऱ्या रजा, गाडीची उपलब्धता आणि आमची सोय, ह्याच्यावर आमचे दर्शनाला येणे अवलंबून असते. तेही वर्षाकाठी होतेच असे नाही .त्यातही तुझ्या दारी येऊनही तुझे साधे मुखदर्शन ही  होईल की नाही ही सुद्धा एक धाकधूक मनात असते. पण माझे लाखो वारकरी बंधू-भगिनी वर्षातुन तुझ्याकडे एकदा येतात  .....माहेरपणाला...
त्यांना हवं असतं ते तुझं डोळाभर दर्शन.  पण तेही आता शक्य होत नाही ना.
अरे कोणत्याही आईला कळत की, आपल्या बाळाला काय हवय . त्याचा थोडासा ही उतरलेला चेहरा आईच्या नजरेतून सुटत नाही . मग तुला आमचं दुर्मुखलपण अजूनही दिसतच नाही का?
मान्य आहे आम्ही खूप चुका केल्यात, आणि चुकीला शिक्षा ही हवीच. पण या शिक्षेला ही अंत हवाच ना माऊली. 
पुरे झाली आता ही शिक्षा आम्हाला तुझ्या पदरात घे. आईचा पदर मुलांच्या चुका झाकण्यासाठी खूप मोठा असतो ना, 
मग तू तर जगत माऊली ना!
आमच्या चुकांची ही जाणीव आम्हाला आता झाली आहे *' पैसा म्हणजे सर्वस्व नसते* हे आता आम्हाला पटलं आहे. आपल्या माणसांपुढे काहीच नसतं.  माऊली, या काळात आम्ही तुझ्याशी मानसिक पातळीवर खूप संवाद साधला. तुझा विसर कधी आम्हाला पडणे शक्यच नाही. घेत असलेला प्रत्येक श्वास हि तुझीच देणगी आहे. ही जाणीव आता प्रकर्षाने झाली आहे. हो पण काळानुसार आम्ही फारच बदललो हेही तितकेच खरे, सर्वच गोष्टीत शॉर्टकट शोधायची वाईट सवय लागली. मग ती तुझी पूजा असो की घरातले कुलाचार . यात काही गोष्टींना इलाजच नव्हता आणि काही गोष्टीत हलगर्जीपणा. आषाढी एकादशीचा उपवास तर आमच्यासाठी एक सेलिब्रेशनच झाले. त्यात नवनवीन फराळाची रेलचेल झाली. उपवास या भावनेला हरताळ फासला गेला.  सगळं- सगळं मान्य, पण काही गोष्टी काळानुसार बदलत गेल्या.
माऊली, खरं सांगू बेरोजगारी उपासमार, अपुऱ्या आरोग्यसेवा ह्याच्याशी आम्ही आजही लढत आहोत .भीती तर आता सदोदित आहे. पण मन कधी भीतीने व्याकूळ होते सांगू, एखाद्या दोन वर्षाच्या पिल्लाशी मन रमाव म्हणून बोलावं व त्याला म्हटलं की " चल आपण जरा बाहेर चक्कर मारू"तर ते पिल्लू म्हणत "नको बाहेर करोना आहे ना". त्याच्या डोळ्यातील भीती आता नाही बघवत. अरे, काय रे आयुष्य आमच्या मुलांचे. अशाच वातावरणात जर ते मोठे झाले तर ते कोणावर विश्वास ठेवतील. सततची असुरक्षितता या वयात त्या बाल मनावर आघात करेल.
माऊली त्यांचही बालपण फुलू दे. आज जर ते कोणावर विश्वास ठेवू शकले नाही, तर त्यांच्या मनात भक्ती कशी फुलेल? त्यांच्या उद्याच्या भक्तीची पायाभरणी तुला आजच करावी लागेल.
भविष्यात तुला ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मुक्ताबाई यांच्या सारखा भक्त मेळा हवा असेल तर तुला भक्तीच्या बीजांची पेरणी आत्ताच करायला हवी माऊली.🙏
....... *सौ.प्रांजली नवीन कुलकर्णी*

Comments